कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

कल्याण ।। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना  शासनाकडून घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर व जगन्नाथ शिंदे यांनी दिले आहे. पत्रकारांना मात्र शक्यतो एकाच पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

ठाणे जिल्ह्यातुन प्रसिध्द होणार्‍या दैनिक जनमतच्या ३१ वा वर्धापनदि सोहळा कल्याणच्या सार्वजनिक वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, माजी महापौर रमेश जाधव, ठाणे जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष संजय पितळे, ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष देवानंद भोईर, आगरी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर, दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे, सत्कारमूर्ती शतायुषी जेष्ठ पत्रकार दामूभाई ठक्कर व प्रशांत मुल्हेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यासमयी आमदार विश्वनाथ भोईर यांनी दैनिक जनमतच्या वाटचालीचा आढावा घेत जनमत परिवाराच्या परिश्रमाचे कौतुक केले. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक पत्रकार संघ असल्याची खंत व्यक्त करत सांगितले की, पत्रकारांच्या समस्यांचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावायचे असतील तर ठाणे महापालिकेच्या धर्तीवर आपल्या महापालिकेतही एकच पत्रकार संघ असण्यासाठी सर्वच पत्रकारांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

ठाणे शहरातील पत्रकारांना घरे मिळवून देण्यात यशस्वी झालेले ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पत्रकारांनाही घरे मिळू शकतात, त्याबाबत योग्य तो प्रस्ताव सादर केल्यास आपण या बाबत शासन दरबारी प्रयत्न करु. तसेच दैनिक जनमतच्या वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दैनिक जनमतचे आपण पहिल्यापासून वाचक असल्याचे आवर्जुन सांगितले. त्याचप्रमाणे राज्याचे गृहनिर्माणमंत्री आमच्याच पक्षाचे असल्याने येथील पत्रकारांनाही घरे मिळवून देण्याचा आपणही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी महापौर रमेश जाधव यांनी दैनिक जनमतच्या पडत्या काळातही दैनिक जनमतचा अंक निघण्यासाठी संपादक तुषार राजे यांच्या धडपडीचे किस्से कथन केले. आपण दैनिक जनमत सुरु झाल्यापासून नियमित वाचक असल्याचे सांगितले.

यासमयी ज्येष्ठ पत्रकार, प्रशांत मुल्हेरकर तसेच आयुष्याचे शतक पुर्ण केलेले शतायुषी ज्येष्ठ पत्रकार दामूभाई ठक्कर यांचा दैनिक जनमत परिवाराच्यावतीने शाल, सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. आपल्या घरच्यांनी केलेला हा सत्कार कायमस्वरूपी स्मरणात राहिल असे प्रशांत मुल्हेरकर यांनी सांगितले तर दामूभाई ठक्कर यांनीही आपल्या पत्रकारीतेतील अनेक आठवणींना उजाळा देत दैनिक जनमत परिवाराचे आभार मानले. जनमतचे मावळते संपादक तुषार राजे यांनी आपल्या प्रास्ताविकात दैनिक जनमच्या यशात हात भार लावणार्‍यांचे आभार मानले.

जनमतच्या वाटचालीत सहकार्य करणारे कर्मचारी नितेश चव्हाणके, विलास भोईर यांचेसह अनेक प्रतिनिधींचाही समयोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ .गिरीष लटके यांनी केले तर उपस्थितांचे आभार तेजस राजे यांनी मानले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट