कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे अर्थसंकल्प सादर

कल्याण :

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्‍कम रु. 1591.84 कोटी जमा आणि रक्‍कम रु. 1260.89 कोटी खर्चाचे, रु.330.96 कोटी अखेरची शिल्लकेसह सन 2020- 2021 चे सुधारीत अर्थसंकल्प तसेच सन 2021-22 साठी रक्‍कम रु. 1700.26 कोटी जमा व रक्‍कम रु. 1699.27 कोटी खर्चाचे, रु. 99.00लाख शिल्लकेचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज जाहिर करुन मंजूर केले.

या वर्षी कोरोनाची महामारी संपली नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था ही केंद्र स्थानी करुन बजेट सादरीकरण करण्यात आले आहे. सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात मालमत्ता करापोटी 360 कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून शासनाकडून प्राप्त होणा-या जी.एस.टी. अनुदान व मुद्रांक शुल्कापोटी 308 कोटी रुपये अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. भांडवली उत्पन्नामध्ये महापालिकेचे स्वत:चे भांडवली उत्पन्न आणि शासनाकडून भांडवली प्राप्त होणारे अनुदान असे एकुण रक्कम 401.21 कोटी एवढा निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. चालू कोरोना साथीवर रु. 135 कोटी खर्च झाले असून आगामी वर्षातही कोरोना साथ सुरु राहण्याची शक्यता विचारात घेवून त्यासाठी रु.97.10 कोटी तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांना त्याच्या राहत्या परिसरात व आपल्याच प्रभागात अत्यल्प दरात वैदयकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे या दृष्टीने प्रत्येक प्रभाग क्षेत्रात किमान 2 आपला दवाखाना/प्रभाग दवाखाना सुरु करण्यात असून महापालिका क्षेत्रात याप्रकारचे 25 दवाखाने उभारण्याचा मानस आहे.

गोरगरिब नागरिकांना अत्यल्प दरात डायलेसिसची सुविधा देण्यासाठी कल्याण येथे 2 व डोंबिवली येथे 2 अशी 4 डायलेसिस केंद्र उभारण्यात येणा आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना माफक दरात सिटी स्कॅन/ एम.आर.आय. स्कॅन सुविधा रुक्मिणीबाई रुग्णालयात देखील उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.

कामाची निकड व प्राधान्यक्रम ठरवून कामे करणे, महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणे, अनावश्यक बाबींवर खर्च टाळणे, काटकसर करणे, आर्थिक स्थिती सुधारणेकामी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याचा मनोदयही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याकरीता या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चाअंतर्गत रुपये 4.00 कोटीची व महसुल खर्चासाठी रुपये 35.00 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

समाजातील दुर्बल घटक, अनसुचित जाती व जमाती, विमुक्त जाती व भटक्या जाती यांच्या कल्याणाकारी योजनांसाठी अंदाजपत्रकात रक्कम रुपये 10.66 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

शहराचे विकासासाठी विविध प्रकारचे विकास प्रकल्प महापालिकेमार्फत राबविले जात असून असे प्रकल्प राबविण्यासाठी तसेच शहरातील विविध समस्या लोकसहभागातून सोडविण्यासाठी विशिष्ट समस्याचा सखोल अभ्यास व संशोधन करण्यासाठी संबंधित विषयातील " विचारगट" Think Tank तयार करण्याचा मानस आहे. या विचारगटासोबत नियमित बैठका घेवून शहराच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट