
माथेरान मधील रस्त्याला क.डो.म.पा.चे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे नाव
- एबी न्यूज, वार्ताहार
- Apr 09, 2021
- 570 views
कल्याण ।। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी महापालिकेत रुजू झाल्यापासून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली शुन्य कचरा मोहिम राबविण्यासाठी अनेकविध अभिनव संकल्पना राबविल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हयाचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रामदास कोकरे यांचेकडे सोपविला होता. त्यांनी, तत्पुर्वी वेंगुर्ला व कर्जत येथे त्यांचेमार्फत राबविलेली कचरा मुक्त डंपिंग ग्राऊंड ही संकल्पना महाराष्ट्राचे मिनी हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणा-या माथेरानमध्ये देखील राबविली आणि ती यशस्वी करुन दाखविली. रामदास कोकरे यांनी माथेरानमधील डंपिंग ग्राऊंडचे रुपांतर खेळाच्या मैदानात केले तसेच माथेरानच्या पर्यावरण पुरक सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिल्याबाबत माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने, नगर परिषद हद्दीतील सेटविला नाका ते कचरा डेपो या रस्त्याचे नामकरण श्री. रामदास तुकाराम कोकरे मार्ग असे करुन रामदास कोकरे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
सदर नामकरणाच्या उद्घाटन सोहळ्यास तत्कालिन रायगड जिल्हाधिकारी व विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, अतिरिक्त आयुक्त कडोमपा, सुनिल पवार ,उपायुक्त उमाकांत गायकवाड,माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व इतर मान्यवर हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
रिपोर्टर