खाजगी कोविड रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयातील फायर ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेचे ऑडिट करून घ्यावे - आयुक्त

कल्याण ।। महापालिका क्षेत्रातील खाजगी कोविड रुग्णालयांनी त्यांचे रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचे, ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेचे ऑडिट करून घ्यावे अशा सूचना महापालिका आयुक्त यांनी आज दिल्या. महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांसमवेत संपन्न झालेल्या वेबिनार मध्ये त्यांनी या सूचना दिल्या. कोविड रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये याकरिता खाजगी कोविड रुग्णालयांनी ऑक्सीजन चे प्लांट उभारावे असे आवाहन या वेबिनार च्या माध्यमातून आयुक्तांनी खाजगी कोविड रुग्णालयांना केले. महा पालिकेची रुग्णालये व खाजगी रुग्णालये यांचेकडील ऑक्सिजन पुरवठा व रेडिमिसेवीर  इंजेक्शन चा वापर या व इतर बाबींच्या पाहणीसाठी भरारी पथकाची नेमणूक केली असल्याची माहितीही पालिका आयुक्तांनी यावेळी दिली. रॅमिडिसिव्हीर इंजेक्शन मार्केटमध्ये उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना त्याचे प्रिस्क्रिप्शन लिहून  देऊन धावाधाव करायला लावू नये अशाही स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या

सदर वेबिनार नंतर महापालिका आयुक्तांनी  महापालिका कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचे समवेत बैठक घेतली. सदर बैठकीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये (Dedicated Covid Hospital) 95 पेक्षा कमी सॅच्युरेशन असलेल्या रुग्णांनाच दाखल करून घ्यावे, 95 पेक्षा जास्त सॅच्युरेशन असलेल्या रुग्णांना CCC  रुग्णालयात म्हणजे टाटा आमंत्रा अथवा साई निर्वाणा येथे दाखल करावे अशा सूचना दिल्या. त्याच प्रमाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांनी रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर रुग्णालय यांनी संदर्भित केलेलेच रुग्ण दाखल करून घ्यावेत, परस्पर येणारे रुग्ण दाखल करून घेऊ नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी महापालिकेच्या कोविड रुग्णालयात  थेट रुग्ण दाखल करण्याचा आग्रह न धरता सदर रुग्ण रुक्मिणी बाई व शास्त्रीनगर रुग्णालयात संदर्भित करावेत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले ,त्याच प्रमाणे महापालिका कोविड रुग्णालयांनी त्यांचेकडील  डिस्चार्ज होणाऱ्या कोविड रुग्णांची यादी  सकाळी 11 वाजेपर्यंत महापालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवावी म्हणजे तेवढेच रुग्ण महापालिका कोविड रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन केले जाईल असेही ते पुढे म्हणाले. सदर बैठकीस सावळाराम क्रीडा संकुल कोविड रुग्णालयाचे डॉ. राहुल घुले, लाल चौकी आर्ट गॅलरी येथे कोविड रुग्णालयाचे डॉ. अमित गर्ग, जिमखाना  कोविड समर्पित रुग्णालयाचे डॉ. साहिल शेख, त्याच प्रमाणे प्रत्येक कोविड हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉक्टर ,महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, उपायुक्त आरोग्य सुधाकर जगताप, उपायुक्त परिवहन डॉ. दीपक सावंत, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पान पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट