कोविडची लक्षणे दिसून आल्यास रुग्णांस त्वरीत आरटीपीसीआर/ॲन्टीजेन टेस्ट करण्यास प्रवृत्त करावे - डॉ. सूर्यवंशी

कल्याण ।। कोविडची लक्षणे दिसून आल्यास रुग्णांस त्वरीत आरटीपीसीआर/ॲन्टीजेन टेस्ट करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी आज केले. कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेचा सामना करणे संदर्भात कल्याण डोंबिवली परिसरातील खाजगी वैदयकीय व्यावसायिक यांचे समवेत दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज सायंकाळी संपन्न झालेल्या वेबिनारमध्ये बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.

वेबिनारच्या प्रारंभी सर्व डॉक्टरांच्या कोविड कालावधीतील अमूल्य सहकार्यामुळे व भरीव योगदानामुळे महापालिकेस राष्ट्रीय स्तरावरील "कोविड-19 इन्होवेशन अवार्ड " प्राप्त झाल्याचे सांगुन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिक यांचे आभार मानले.

कुठलाही नागरिक आजारी पडल्यावर विश्वासापोटी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे प्रथम उपचारासाठी जातो, अशावेळी त्यास कोविडची लक्षणे दिसून आल्यास केवळ प्रथमोपचार न करता त्यास आरटीपीसीआर/ॲन्टीजेन टेस्टसाठी प्रवृत्त करावे, कारण एखादया रुग्णांनी कोविडची तीव्र लक्षणे दिसून आल्यानंतर कोविडची टेस्ट केल्यास त्याचा आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या 32 टेस्टींग सेंटरवर सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत कोविड टेस्टींगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणी 24 x 7 कोविड टेस्टींगची सुविधा विनामुल्य स्वरुपात नागरिकांसाठी उपलब्ध आहे, अशीही माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या वेबिनारमध्ये दिली. यापूर्वी केलेल्या सहकार्याप्रमाणेच आताही कोविडसाठी सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास कोविड रुग्ण संख्येवर तसेच कोविडमुळे होणा-या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा आशावाद आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

वेबिनारमध्ये उपस्थित कोविड टास्क फोर्सचे डॉ. हिमांशू ठक्कर यांनी कोविड ट्रिटमेंन्ट प्रोटोकॉलबाबत तसेच वेबिनारला उपस्थित डॉक्टरांच्या इतर प्रश्नांबाबत त्यांना मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये कल्याण डोंबिवलीतील 100 खाजगी वैदयकीय व्यावसायिक सहभागी झाले होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट