
कोणतीही करदर वाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे २०२३-२४ च्या अंदाजपत्रक
- एबी न्यूज, वार्ताहार
- Mar 23, 2023
- 200 views
कल्याण ।। कोणतीही करदर वाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रु. २२०६.३० कोटी जमा व रक्कम रु. २२०५.२० कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. ११०.५९ लक्ष शिल्लकेचे महापालिकेचे सन २०२३-२४ चे अंदाजपत्रकाचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सादरीकरण करुन त्यास मंजूरी दिली.
पायाभूत सुविधांना प्राधान्य देणाऱ्या या अंदाजपत्रकात मालमत्ता करापोटी रु. ४२५ कोटी जमा अपेक्षित धरण्यात आली असून पाणी पट्टीपोटी रु. ८०.४० कोटी जमा अपेक्षित धरण्यात आली आहे.
या अंदाजपत्रकात आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असून, बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे प्रत्येकी १० बेडचा क्षमतेचा अतिदक्षता विभाग बाह्ययंत्रणेमार्फत सुरु करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात नागरीकांसाठी एकूण २६ नागरीक केंद्रे कार्यान्वीत करण्यात आली आहेत. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे प्रत्येकी १० बेडचे एन.आय.सी.यु. आणि पी.आय.सी.यु. कार्यान्वीत करण्यात येत आहेत. कल्याण येथे १५० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल पी.पी.पी. तत्वावर उभे करणेकामी मौजे कचोरे येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचे कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
बी.एस.यु.पी. प्रकल्पाअंतर्गत ३१३६ सदनिका पुर्ण झाल्या असून त्यातील १००० सदनिकांचे पात्र प्रकल्प ग्रस्तांना वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत ४१३६ सदनिकांचे काम अंतिम टप्प्यात असून ते डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील ३३ उद्याने व बगीचे यामध्ये जेष्ठ नागरीक व लहान मुलांसाठी ई-टॉयलेट, कन्टेनर टॉयलेट सुविधा करुन देण्याचे प्रस्तावित असून त्यामध्ये महिला/पुरुष/दिव्यांग यांचेकरीता स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
२७ गावांतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एकूण २८ उंच जलकुंभ, २ भूस्तर टाक्या १० संप व पंप गृह व सुमारे २६५ किलोमीटर वितरण वाहिनीचे जाळे उभारुन पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यात येणार आहे. ज्यायोगे सदर गावांमधील नागरीकांना योग्य व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
गतीमान प्रशासनाकरीता महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफीस प्रणालीचा वापर एप्रिल २०२३ पासून टप्याटप्याने करण्यात येणार असून पुढील वर्षांत ई-ऑफीसचा वापर पूर्णपणे करण्यात येणार आहे. याप्रणाली व्दारे सर्व फाईल या डिजीटल स्वरुपात ऑनलाईन सादर केल्या जातील व त्याचा निपटारा ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी/कर्मचारी यांना वेळप्रसंगी कधीही व कोठूनही फाईलचा निपटारा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता येणार आहे.
पाणी पुरवठा अमृत अभियान २.० अंतर्गत टिटवाळा/कल्याण पूर्व व पश्चिम तसेच डोंबिवली पूर्व व पश्चिम मिळून १५ नवीन जलकुंभ बांधणे, टिटवाळा, उंबर्डे, सापर्डे, खंबाळपाडा येथे नवीन जलकुंभ बांधणे, मोहीली गाव येथे २७५ द.ल.ली. क्षमतेचे उदंचन केंद्र बांधून कार्यान्वित करणे व गौरीपाडा येथे ९५ द.ल.ली. क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधून कार्यान्वित करणेंत येणार आहे. या चारही कामांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसे, स्वच्छ व शुध्द पाणी समप्रमाणात पुरवठा करणे शक्य होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील महिलांना त्यांचे क्रिडागुण विकसीत करणेकरीता क्रिडांगणाकरीता आरक्षित असलेल्या मैदानांपैकी काही मैदाने फक्त महिलांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातील महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्री करण्याकरिता महापालिकेच्या बांधणी मिळकतीत एकूण चार ठिकाणी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कल्याण पूर्व ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सदर ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ,प्रदर्शन हॉल ,ई वाचनालय ,कार्यक्रम हॉल, बाग बगीचा इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच कल्याण पश्चिम मोहने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे व सुशोभीकरणाचे काम प्रस्तावित आहे.
महापालिकेची प्रभाग कार्यालये, रुग्णालये इ. ठिकाणी छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असून त्याद्वारे 246 की. वॅट वीज निर्मिती होणार असून एकूण 3.6 लक्ष युनिट ची वार्षिक बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.
केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांच्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्याकरिता अंत्यविधीची सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रिपोर्टर