
मतदार जनजागृतीसाठी माननीय आयुक्त अजय वैद्य यांनी घेतली सामाजिक व व्यावसायिक संघटनांची बैठक
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- May 07, 2024
- 222 views
भिवंडी। आगामी लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागाच्या दृष्टीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कार्यरत सामाजिक स्वयंसेवी संस्था तसेच व्यावसायिक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची आज दि .०७ मे २०२४ रोजी मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली.
२३- भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी आगामी २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघात भिवंडी (ग्रामीण), भिवंडी (पूर्व), भिवंडी (पश्चिम), शहापूर, कल्याण (पश्चिम) व मुरबाड या सहा विधानसभा मतदारसघांचा समावेश आहे. त्यापैकी भिवंडी (पश्चिम) व भिवंडी (पूर्व) हे दोन विधानसभा मतदारसंघ भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात आहेत. या दोन मतदारसंघात अनुक्रमे २,९२,१०७ व ३,१७,३४६ मतदार आहेत. सन २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५३% इतके मतदान झाले होते. तर भिवंडी (पश्चिम) मध्ये ५०% व भिवंडी (पूर्व) मध्ये ४७% इतके मतदान झाले. संसदिय लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने विविध माध्यमांतून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालयातून विविध प्रकारच्या स्पर्धा, पत्रलेखन, पथनाटये, वासूदेव, कव्वाली, पोवाडा, होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स, घंटागाडी, डिजिटल डिस्प्ले, प्रभातफेरी, महिला बचत गटांचे जनजागृतीपर मेळावे, सिनेमागृहे, मोहल्ला कमिटी बैठका, तृतीयपंथीय मतदारांच्या बैठका, गृहभेटी इ. याद्वारे भिवंडी शहरात मतदारांमध्ये जनाजगृती करण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसेवी सामाजिक संस्थांचा तसेच व्यावसायिक संघटनांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. स्वयंसेवी समाज संस्थांनी समाजातील सर्व वंचित घटकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आपल्या उपक्रमांतून प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे व्यावसायिक संघटनांनी त्यांचे ग्राहक, अशील, सहयोगी सदस्य तसेच त्यांचे कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी भिवंडी शहरातील सर्व सामाजिक स्वयंसेवी संस्था व व्यावसायिक संघटना यांनी पुढाकार घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
याप्रसंगी मनपा उपायुक्त प्रणाली घोंगे, अजय एडके, सहाय्यक आयुक्त निवडणूक नितीन पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुशरा सय्यद, जॉईन ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रोसहली सामाजिक संस्थेचे श्रीमती मनीषा भांगरे, गायत्री परिवार सामाजिक संस्थेचे डॉक्टर नीरज गुप्ता, हॉटेल असोसिएशन भिवंडी प्रज्वल शेट्टी, इंडियाचे कावेरी तनयारे, एम . एस.व्ही.टी चे सोनू पंडित, किन्नर अस्मिता संस्थेचे रुमाना अन्सारी, एफ. पी. ए. आय. भिवंडीचे संध्या सोनारकर, अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या निशा सिंह, एफ. एस. डब्लू. (एच. एम. टी.) राजश्री हिरे व राजेश पाठारे उपस्थित होते.
रिपोर्टर