रोजगार मेळाव्यासाठी येणाऱ्या युवक-युवतींसाठी, योग्य प्रकारे नियोजन करावे -- उद्योगमंत्री उदय सामंत

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार मेळावा दि .6 व 7 मार्च रोजी


भिवंडी। कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार  मेळाव्याचे आयोजन  दि. 6 व 7 मार्च 2024 रोजी मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या बेरोजगार युवक-युवतींसाठी आवश्यक ते सर्व नियोजन योग्य प्रकारे करावे, अशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशान्वये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्यामार्फत कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे  आयोजन दि. 6 व 7 मार्च 2024 रोजी मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मॉडेला मिल कम्पाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे या नियोजित मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मेळाव्याच्या नियोजनाकरिता पूर्वतयारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, पोलीस अपर आयुक्त महेश पाटील, पोलीस अधीक्षक श्री. स्वामी, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, दीपक चव्हाण, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सुनील भुटाले, प्रांताधिकारी, मंगेश देसाई  तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवक-युवतींची संभाव्य आकडेवारीची माहिती घेवून त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळी पाणी, मोबाईल स्वच्छतागृह, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस विभागाला सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे विविध विभागांचे येणारे अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था व्यवस्थित करावी. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, याकरिता मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नमूद केलेल्या उपाययोजना करण्यात याव्यात. तात्पुरते रुग्णालय उभारून त्यामध्ये प्रथमोपचार, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती, आवश्यक बेड्स, औषधे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार कराव्यात. सायनिंग बोर्ड लावावेत. पार्किंगच्या ठिकाणीदेखील पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करावी. महारोजगार मेळाव्यास येणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन होईल, त्यांचे शंका समाधान होईल, त्यांना या मेळाव्यातून जाताना रोजगार देवूनच पाठविण्यासाठी सर्वांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, अशाही सूचना दिल्या.

या मेळाव्यात 352 स्टॉल्स असणार आहेत. दि.6 मार्च 2024 रोजी 1 हजार 74 कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये  56 हजार 120 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच दि.7 मार्च 2024 रोजी 1 हजार 45 कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये 44 हजार 774 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

कोकण विभागातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या नमो महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, कोकण विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाचे उपायुक्त श्री. पवार, ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे या सर्वांनी केले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट