
घात करणार्यांची शिवसेना कधीच होवू शकत नाही
- एबी न्यूज, वार्ताहार
- Oct 06, 2022
- 293 views
कल्याणमधील शिवसैनिकांच्या प्रचंड मेळाव्यात जिल्हाप्रमुख विजय साळवी यांचे खडेबोल
कल्याण : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्यांना विश्वासाने जवळ केले, सर्वाधिकार दिले त्यांनीच घात केला. घात करणार्यांची शिवसेना कधीच होवू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांची नेमणूक केली असून त्यांचीच शिवसेना आहे म्हणून आम्ही निष्ठांवंताच्या शिवसेनेत आहोत असे खडेबोल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी कल्याणमधील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले.
दसरा मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून कल्याणच्या शिवसैनिकांचा मेळावा शिवाजी चौकातील गिता हॉलमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी सभागृह खचाखच भरले होते, जेवढे शिवसैनिक बसले होते, तेवढेच शिवसैनिक उभे होते. शिवाय हॉलच्या बाहेरही उपस्थित होते. या सभेत जिल्हाप्रमुख विजय साळवी, उपनेते अल्ताफ शेख, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, तुषार राजे, संघटक रविंद्र कपोते, शहरप्रमुख सचिन बासरे, संपर्क प्रमुख बाळा परब, संजय उकीडवे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया पोटे इत्यांदींची भाषणे झाली.
अनेक शिवसैनिक गेली काही वर्षे दसरा मेळाव्यास जात नाहीत, तरीही दसरा मेळाव्यात तुडुंब भरते, यंदा मात्र पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने दसरा मेळाव्यासाठी जाण्याचे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक तुषार राजे यांनी केले. तसेच ही बाळासाहेबांची शिवसेना नाही असे म्हणणार्यांना सांगितले की, हो, काळाप्रमाणे संघटनेमध्ये उध्दव ठाकरे यांनी अनेक सकारात्मक बदल केले आहेत. त्याचा चांगला परिणाम संघटनेवर दिसून आला आहे. पूर्वी म्हणजे ६६-७० साली जशा निवडणुका लढविल्या त्या पध्दतीनेच आता निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्या काळी कोणाकडेही पैसे नव्हते, या सर्व मंडळींना समोर बसलेल्या शिवसैनिकांनी मोठे केले व ते गबर झाले. आता आपल्यातील सामान्य कार्यकर्त्यांला मोठे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तरुण पदाधिकार्यांनी जबाबदारी घेवून कामाला लागण्याचे आवाहन केले. शहरप्रमुख सचिन बासरे यांनी समारोप करतांना दसरा मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्या दिवशी दुपारी ३ वाजता सर्व शिवसैनिकांनी शिवाजी चौकातील शिवसेना शाखेत यायचे आहे. तेथून वाजत गाजत दसरा मेळाव्याला जायचे असल्याचे सांगितले. अवघ्या एका दिवसात मेळावा आयोजित करुनही शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.
दसर्याला शिवतिर्थावर होणारा मेळावा हा निष्ठेचा मेळावा आहे. त्या मेळाव्यात गद्दारांच्या रावणांचे दहन करण्यात येणार आहे, त्यामुळे मेळाव्यासाठी कोणत्याही वाहनाने न जाता सर्वांनी रेल्वेने जायचे आहे असे आवाहन जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी केले. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्या महावृक्षाच्या मुळावर कोणत्याही अमिषाचा प्रभाव पडत नाही, म्हणूनच ही सर्व महावृक्षाची मुळं आजच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्याला आजच्या पेक्षा दहापटीने दसरा मेळाव्याला जायचे आहे. सध्या अनेक मंडळीं कुंपणावर आहेत, त्यांना हा प्रेमळ इशारा आहे तुम्हाला भरपूर वेळ दिला आहे. काही लोकं म्हणतात `आम्हाला टेंडर दिले आहे, निधी दिला आहे, ठेवी दिल्या आहे, आमचा हॉस्पिटलचा खर्च केला आहे' ही कारणे पुरे आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. एकीकडे भाजपाचे मनसुबे दोन गटांना लढवून सत्ता काबिज करण्याचे आहेत. परंतु आपण कल्याण डोंबिवली महापालिका पूर्वीच्या ताकदीनेच जिंकणार आहोत, त्याची साक्ष आजच्या सभेने मिळाली आहे.
शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख तसेच बाळ हरदास, रविंद्र कपोते इत्यांदींनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना कल्याणच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखविली आहे. कल्याणचे शिवसैनिक कायम ठाकरे परिवाराच्या मागे उभे राहणार आहेत. सध्या ठाकरे या नावाची अनेकांना अॅलर्जी आली आहे. राजकारणातून ठाकरे नाव संपविण्याची कुटील राजनिती सुरु आहे, परंतु निष्ठावंत शिवसैनिक असे कधीही होवू देणार नाही. तसेच दसरा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन सुरेश सोनार यांनी केले.
रिपोर्टर