उल्हासनगर महानगरपालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल
- एबी न्यूज, वार्ताहार
- Sep 02, 2023
- 242 views
उल्हासनगर ।। उल्हासनगर महापालिकेतील वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी नगररचना विभागात खासगीरित्या जे.डी. जगताप, राहुल जोते, दीपक कुऱ्हाडे, स्वाती कदम हे बोगस कर्मचारी कामाला ठेवले होते. या बोगस कर्मचाऱ्यांजवळ कोणत्याही प्रकारचे शासकीय अथवा निमशासकीय ओळखपत्र नसून धक्कादायक बाब म्हणजे हे महापालिकेमध्ये शासकीय दस्तावेज हाताळत, शासकीय कर्मचारी म्हणून महापालिकेमध्ये वावरत होते.
राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर व प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी दिनांक १०/०८/२०२३ रोजी जे. डी. जगताप यांना रंगेहाथ पकडुन उल्हासनगर मध्यवर्ती पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते. परंतु महानगरपालिका तक्रार देत नसल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. महापालिका आयुक्त अजीज शेख यांना तक्रार करून देखील संबंधितांवर गुन्हा दाखल न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत होते. गुन्हा दाखल होत नसल्याने राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी दिनांक ३१/०८/२०२३ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून चक्र फिरल्यानंतर महापालिका आयुक्तांनी प्रथम जे.डी. जगताप, राहुल जोते, दीपक कुऱ्हाडे, स्वाती कदम या चार खासगी कर्मचाऱ्यांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु या गँग चा मुख्य सूत्रधार नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामध्ये टाळाटाळ करत होते. त्यावेळी उपोषण कर्त्यांनी जो पर्यंत मुख्य आरोपी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे सांगत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.
त्यानंतर महापालिका आयुक्त यांनी पुरवणी जबाब नोंद करत नगररचनाकार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगररचनाकार प्रकाश मुळे, जे.डी. जगताप, राहुल जोते, दीपक कुऱ्हाडे, स्वाती कदम यांच्या विरोधात उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले. सदर उपोषणाला राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, कायद्याने वागा लोकचळवळ चे राज असरोंडकर व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अन्याय विरोधी संघटना चे दिलीप मालवणकर व विविध संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता.
रिपोर्टर