
भिवंडी पालिकेत जागतिक महिलादिन कार्यक्रम संपन्न
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Mar 13, 2024
- 271 views
महिलांनी ज्या कोणत्या क्षेत्रात काम कराल तिथे आत्मविश्वासपूर्वक काम करा ---पालिका आयुक्त अजय वैद्य
भिवंडी।। अलीकडे बदलत्या काळामध्ये महिलांना वेगवेगळ्या आघाडीवर काम करावे लागत आहे. आपल्या घरापासून ते कार्यालयापर्यंत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागत आहेत. या सर्व भूमिका या महिला चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. आपल्याला राजमाता जिजाऊ यांचा तसेच सावित्रीबाई फुले यांचा समृध्द वारसा लाभला आहे, विविध क्षेत्रातील अनेक कतृत्ववान महिला या देशाने घडविल्या आहेत. त्या आज आपल्या सर्वांचा आदर्श आहेत. पालिकेत देखील अनेक महिला चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. आपण ज्या कोणत्या क्षेत्रात काम कराल तिथे आत्मविश्वासपूर्वक काम करा, असे उद्गार पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी काढले, पालिकेच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय राजय्या गांजेगी सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते. या वेळेला व्यासपीठावर पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त प्रणाली घोंगे, कार्यकमाच्या प्रमुख पाहुण्या सौ अपूर्वा अजय वैद्य, प्रीती विठ्ठल डाके , भिवंडी आय. ए. एम च्या अध्यक्षा डॉ.उज्वला बर्दापूरकर, सुप्रसिध्द निवेदिका दीपाली केळकर, उपस्थित होत्या.
आयुक्त अजय वैद्य पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात देखील महिलांचे योगदान महत्वाचे आहे. महापालिकेचे अनेक विभाग या महिला चालवत आहेत. विशेष करून वैद्यकीय आरोग्य विभाग काम महिला अधिकारी वर्ग चालवत आहेत हे अभिमानास्पद आहे. अनेक महिलांनी बचत गटाचा माध्यमातून देखील चांगले काम केले आहे, कामाच्या ठिकाणी तसेच सर्व ठिकाणी महिलांचा मानसन्मान राखायला हवा असे देखील पालिका आय़ुक्त यांनी नमूद केले. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अपूर्वा अजय वैद्य यांनी नमूद केले की प्रत्येक महिला ही वेगवेगळ्या पातळयांवर कार्यरत असते आणि तीने निवडलेल्या प्रत्येक पातळीवर ती यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःमध्ये तीन स्वत्व ओळखणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेनी स्वतःला ओळखयाला शिका, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःला खुश ठेवायला शिका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सक्षमता राहील याची स्त्रीने महिलेने काळजी घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. उज्वला बर्दापुरकर यांनी आपला महिलांचे आरोग्य व मानसिक स्वास्थ या विषयावर विषय मांडताना नमुद केले की, आपण प्रत्येक स्त्रीला शारीरिक व मानसिक आजारावर त्रास होत असतात. मानसिक आजार याच्यापासून वेगवेगळे शारीरिक आजार उद्भवतात. मानसिक आजार याच्यावर मात करणे, मानसिक त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मन रमविणे आवश्यक आहे. मन मोकळं करणं हे आवश्यक असतं, मानसिक आजार झाल्यावर शरीराचे आजार उद्भवतात त्याकरीता मानसिक आजारांवर समुपदेशन आवश्यक आहे. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, मुलगा व मुलगी हा भेद भाव करू नका. महिलांच्या अनेक आजार हे मानसिक स्वरूपाचे असतात. त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. मानसिक आजार कमी झाले तर शारीरिक आजार कमी होतात. काहीतरी कला शिका, कला आत्मसात करा आणि मानसिक आजार याच्यापासून दूर राहा, जर मानसिक स्वास्थ चांगलं असेल तर शारीरिक स्वास्थ चांगले राहील व त्याचबरोबर कुटुंबाच स्वास्थ देखील चांगलं राहते, असे डॉक्टर उज्वला बर्दापूरकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या दुस-या वक्त्या सुप्रसिध्द निवेदिका दिपाली केळकर यांनी आपला स्त्रीधन हा विषय मांडताना वेगवेगळ्या ओव्यांची, उखाणे पारंपारिक लोकसाहित्य त्यातून निर्माण झालेल साहित्य म्हणजे हे खरे स्त्रीधन आहे. स्त्रीधन म्हणजे निरक्षर स्त्रियांनी आपल्याकरता हा ओव्या, उखाणे या मार्फत हाच धनाचा संचय करून दिला आहे. केवळ दागदागिने म्हणजे स्त्रीधन नव्हे तर महिलांनी आपण घेतलेले शिक्षण, संस्कार, स्त्रीचा स्वभाव गुण हे खरे स्त्रीधन आहे. केळकर यांनी अनेक मराठी बोली म्हणी सादर करून, उखाणे घालून कार्यक्रम मनोरंजनात्मक करत त्यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली. पूर्वीच्या स्त्रियांच्याकडे होती मनोरंजन करण्याची चांगली साधने होती. त्यातून त्यांचे चागंले मनोरंजन करीत असे, निरक्षर स्त्रियांनी जपलेला हा ठेवा आपल्याकडे संस्कृती म्हणून आलेला आहे त्याची जपणूक करणे व त्यात वाढ करणे आवश्यक असल्याने केळकर यांनी नमुद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त प्रणाली घोंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समाज कल्याण विभागातील अनिल आवाड, समिर मुंढे, सहा.आस्थापना विभाग प्रमुख कल्याणी चन्ने, स्थानिक संस्था प्रमुख समिर जवरे यांनी विशेष मेहनत घेतली.
रिपोर्टर