सम्राट अशोक कल्याण शाळेचा सतत बाराव्या वर्षी शंभर टक्के निकाल

अंतर्गत मूल्य मापनात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली

भिवंडी: कोरोना महामारीमुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा भरल्या नाहीत. मात्र इयत्ता नववी चा वार्षिक निकाल व इयत्ता दहावीचे  अंतर्गत मूल्यमापनाद्वारे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यमापनामुळे  विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत बाजी मारली. अनेक विद्यार्थ्यांना आवश्‍यक पेक्षा जास्त  गुण मिळालेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची भीती होती. परंतु महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षा रद्द करण्याच्या शासन निर्णयामुळे विद्यार्थी खूष होते. आता निकाल लागल्यावर भरमसाठ गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट कल्याण  संचालित सम्राट अशोक विद्यालयात शिक्षकांचा प्रयत्न व विद्यार्थ्यांच्या मेहनतीने सलग बारा वर्षापासून शंभर टक्के निकाल आहे. याही वर्षी शंभर टक्के निकाल लावून सातत्य ठेवले आहे. शाळेत रश्मी तांबे 92.60 टक्के गुण मिळवून प्रथम , जान्हवी गायकवाड 91.60 टक्के गुण मिळवून  द्वितीय तर विशाल कडू या विद्यार्थ्याने 90.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला.शाळेच्या वतीने  गुणवंत मुलांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत केले.  शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, या पुढे कोरोना असो वा नसो. आरोग्य सांभाळून पुढील शिक्षणाचा अभ्यास करत रहा. परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाइन होऊ द्या. परंतु आपलं  वाचन-लेखनाच सातत्य कायम असू द्या. कोरोना काळातही शिक्षकांनी ऑनलाइन तासिका घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांनी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षकांचे आभार मानले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट